अहिल्यानगर : अहिल्यानगर जिल्ह्यातील कोटला गावात आंदोलकांवर पोलिसांनी लाठीचार्ज केल्याची घटना समोर आली आहे. काही आंदोलक कोटला गावात रास्ता रोको करत होते. यावेळी पोलिसांनी आंदोलकांना रस्त्यावरून हटण्याची विनंती केली. पण आंदोलक रस्त्यावर हटले नाहीत. यानंतर पोलीस दलाने आंदोलकांवर लाठीचार्ज केला. यात काही आंदोलक जखमी झाल्याची माहिती आहे. या घटनेचा व्हिडीओ आता समोर आला असून सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मागील अनेक वर्षांपासून कोटला गावात शिवप्रतिष्ठान हिंदुस्तानच्या वतीने दुर्गा माता मार्च काढला जातो. परंपरेनुसार, आज सकाळी देखील अशाच प्रकारे मिरवणूक काढण्यात आली होती. मात्र यावेळी मिरवणुकीतील काही समाजकंटकांनी आक्षेपार्ह रांगोळी काढून त्यावरुन मिरवणूक नेल्याच्या कृतीमुळे मुस्लिम समाजाच्या भावना दुखावल्या. हा प्रकार समोर आल्यानंतर संबंधित समाज आक्रमक झाला आणि त्यांनी कारवाईची मागणी केली. यानंतर पोलिसांनी एका संशयिताला ताब्यात घेतलं. दरम्यान या कृत्यामुळे अहिल्यानगरच्या कोटला परिसरातील मुस्लिम समाज आक्रमक होत रस्त्यावर आला तेंव्हा पोलिसांनी या जमावाला पांगवण्यासाठी लाठीचार्ज केला.
दरम्यान, यामुळे गावात तणावाचे वातावरण निर्माण झाल्याने घटनास्थळी आलेल्या पोलिसांनी आंदोलकांना आंदोलन मागे घेण्यास सांगितले. पण आंदोलक जागेवरून हलले नाहीत. यानंतर पोलिसांनी गर्दीला पांगवण्यासाठी सौम्य प्रकारचा लाठीचार्ज केला.